Kapalbhati Pranayam| हठयोगातील शुद्धीकरणाची प्रभावी क्रिया “कपालभाती” म्हणजे काय? योग्य पद्धत, लाभ आणि दुष्परिणाम जाणून घ्या.

Kapalbhati Pranayam: योगशास्त्रानुसार आपले शरीर हे जीवात्म्याचे पवित्र मंदिर मानले जाते. या मंदिराची बाह्य आणि आंतरिक शुद्धता करणेही तितकेच महत्वाचे आहे. आपण रोज अन्न खातो, श्वास घेतो, विविध वातावरणात राहतो त्यामुळे शरीरात कफ, वात, पित्त यांचे असंतुलन निर्माण होऊ शकते.

अशावेळी शरीराची शुद्धी करण्यासाठी हटयोगात सांगितलेल्या षटकर्म क्रिया अत्यंत उपयुक्त ठरतात. तसे पाहता षट्कर्माचा अभ्यास रोज करणे आवश्यक नसते पण जेव्हा शरीरात कफ वाढलेला असेल, श्वसनातील अडथळे, पचनाचे त्रास किंवा मानसिक अस्वस्थता जाणवते, तेव्हा या शुद्धिक्रिया करणे फायदेशीर ठरते.

याच षटकर्मपैकी कपालभाती बद्दल संपूर्ण आणि सविस्तर माहिती या लेखात जाणून घेणार आहोत. या षट्कर्माचा उद्देश शरीरातील अंतर्गत पोकळ्या, नाड्या आणि श्वसनमार्ग शुद्ध करणे हा आहे. या द्वारे शरीर शुद्ध झाल्यास प्राणायाम, ध्यान, धारणा आणि इतर योगाभ्यास अधिक प्रभावीपणे करता येतात.

कपालभाती म्हणजे काय?

“कपाल” म्हणजे कपाळ किंवा डोके आणि “भाती” म्हणजे तेजस्वी होणे किंवा शुद्ध होणे. म्हणूनच कपालभाती म्हणजेच डोक्याचा आणि श्वसन संस्थेच्या शुद्धीची क्रिया होय.

कपालभाती ही प्रत्यक्षात एक श्वसन शुद्धी प्रक्रिया आहे. आधुनिक काळात कपालभातीला प्राणायाम म्हणून ओळखले जाते परंतु हटयोगानुसार ही शुद्धिक्रिया आहे. कपालभातीचे तीन प्रकार सांगितले आहेत; वातक्रम, व्युत्क्रम, शीत्क्रम.

Kapalbhati Pranayam
Kapalbhati Pranayam

आजकाल सर्वसाधारण ज्या कपालभातीचा अभ्यास केला जातो तो वातक्रम कपालभाती प्रकारामधील आहे; ज्यामध्ये पोटातील स्नायूंच्या साह्याने जणीवपूर्वक उश्वास जोरात बाहेर सोडला जातो आणि श्वास आपोआप आत घेतला जातो.

कपालभाती करण्याची पद्धत

आज प्रचलित असलेल्या कपालभाती प्राणायमचा अभ्यास करत असताना, पोटाच्या स्नायूंवर जास्त ताण पडतो. याच स्नायूवर तो आधारित आहे; ज्यामध्ये जोरदार रेचक (श्वास सोडणे) आणि सहज पूरक (श्वास घेणे) वर भर असतो.

सुरवातीस साधी मांडी घालून बसा किंवा पद्मासन, समासन, वज्रासन यापैकी कोणत्याही एका ध्यानात्मक आसनात बसा. आपल्या दोन्ही हाताची द्रोणमुद्रा किंवा ज्ञानमुद्रात आपल्या गुडघ्यावर ठेवा.

Read Also  Daily Mudras|दररोज केल्या जाणाऱ्या 'योगमुद्रा' नी शरीर निरोगी कसे राहते? समजून घ्या इथे.

पाठीचा कणा ताठ ठेऊन मान सरळ करा आणि डोळे अलगद बंद करा. सुरुवातीला एक खोल दीर्घ श्वास घ्या, पोट आत खेचत जोराने, साधारण एक सेकंदमध्ये आपला उश्वास झटक्याने बाहेर सोडा, श्वास बाहेर गेल्यावर पुन्हा शरीरात येणारा श्वास आपोआप आत येईल. तो जाणीवपूर्वक घेऊ नका.

पुन्हा छातीभारून श्वास घेतल्यावर, पोट आत खेचून उश्वास झटक्याने बाहेर सोडा. ही क्रिया वेगाने करा. प्रति सेकंद एक आवर्तन सुरुवातीला करा असे पंधरा ते वीस वेळ सराव करा आणि थोडा वेळ थांबा. याचा कालावधी सरावाने वाढवत राहा. जेंव्हा दम लागेल तेंव्हा त्वरित थांबा आणि संथ श्वसन म्हणजेच नैसर्गिक श्वसन करा.

कपालभाती दरम्यान शरीरात काय घडते?

Kapalbhati Pranayam करत असताना पोटाच्या स्नायूंच्या आकुंचनामुळे फुफुसांमधील शिल्लक हवा बाहेर टाकली जाते. त्यामुळे रक्तातील कार्बन डाय-ऑक्साइड चे प्रमाण कमी होते. यानंतर जेव्हा श्वास पुन्हा शरीरामद्धे येण्यास सुरू होतो तेव्हा शरीरातील पेशींना अधिक प्रमाणात ऑक्सिजन मिळतो.

यामुळे श्वसन संस्था मार्ग मोकळा होतो. मेंदूला ताजेपणा मिळतो. शरीरात ऊर्जा वाढते. आपले शरीर ही क्रिया केल्यावरती पुढील प्राणायाम करण्यासाठी तयार करते.

कपालभातीचे शारीरिक लाभ

  1. श्वसन संस्थेची शुद्धी: नाक, घसा, श्वासनलिका आणि फुफुसे स्वच्छ होतात. दमा, सर्दी, कफ यामध्ये उपयुक्त.
  2. पचन सुधारते: पोटातील अवयवांना मसाज मिळतो. गॅस, अजीर्ण, बद्धकोष्ठता कमी होते.
  3. मेंदू व हृदयासाठी लाभदायक: रक्तपुरवठा सुधारतो, मेंदू अधिक सक्रिय होतो, एकाग्रता वाढते.
  4. चेहऱ्याचे तेज वाढते: रक्ताभिसरण सुधारल्याने त्वचेवर नैसर्गिक तेज येते.
  5. पोटावरील चरबी कमी होते: नियमित सरावामुळे पोटातील मेद कमी होण्यास मदत होते.
  6. आवाज सुधारतो: घसा आणि श्वसन संस्था स्वच्छ झाल्याने आवाज स्पष्ट आणि मधुर होतो.

मानसिक आणि न्यूरोलॉजिकल परिणाम

Kapalbhati Pranayam मुळे शाररीक लाभाबरोबर मानसिक स्तरावरती सुद्धा खूप चांगले परिणाम होतात. कपालभातीमुळे स्वायत्त मज्जा संस्थेवर (Autonomic Nervous System) वरती सकारात्मक परिणाम होतो. अनुकंपी (Sympathetic) आणि परानुकंपी (Parasympathetic) प्रणाली संतुलित होतात.

Read Also  Bhastrika Pranayam|भस्त्रिका प्राणायाम म्हणजे काय? करण्याची योग्य पद्धत आणि फायदे, दक्षता आणि शास्त्रीय माहिती समजून घ्या.

मानसिक तणाव कमी होतो. चिडचिडेपणा, राग, मनातील अस्थिरता कमी होते. कपालभातीचा अभ्यास रोज केल्याने काम, क्रोध, लोभ, अहंकार यासारख्या मानसिक अशुद्धी कमी होतात.

कोणासाठी उपयुक्त?

खास करून विद्यार्थ्यांसाठी, एकाग्रता वाढवण्यासाठी याचा जास्त उपयोग होतो. त्याचबरोबर ऑफिसमध्ये बसून काम करणाऱ्यांसाठी किंवा शरीरातील जाडपणा कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी खूपच फायदेशीर आहे. श्वसनाचा त्रास असणाऱ्यांनी मात्र तज्ञांच्या सल्यानुसार हा Kapalbhati Pranayam करावा.

Kapalbhati Pranayam
Kapalbhati Pranayam

कपालभाती करताना घ्यायची काळजी

काही परिस्थितीत मात्र कपालभाती करू नये ज्यांचे अलीकडेच पोटाची शस्त्रक्रिया झाली असल्यास किंवा हृदयविकार किंवा मेंदू विकार असल्यास, उच्च रक्तदाब असल्यास, महिलांच्या गर्भावस्थेत विशेष त्याचबरोबर तीव्र पाठ दुखी असल्यास हा प्राणायाम करू नये.

Kapalbhati Pranayam नेहमी रिकाम्या पोटी आणि सकाळी करणे योग्य असते. त्यासाठी कोणतेही ध्यानात्मक आसनात बसावे. पाठीचा कणा ताट असणे अत्यंत आवश्यक आहे, सुरुवातीस किमान एक ते दोन मिनिटं करावा त्यानंतर सराव अधिक झाल्यावर पाच मिनीटपर्यंत करावा पण त्याहून अधिक करू नये.

Kapalbhati Pranayam

कपालभाती ही केवळ श्वसनक्रिया नसून एक प्रभावी शुद्धि प्रक्रिया आहे. शरीरातील कफदोष कमी करणे, श्वसन मार्ग स्वच्छ करणे, पचन सुधारणा आणि मानसिक स्थैर्य मिळवणे यासाठीही अत्यंत उपयुक्त आहे. योगशास्त्रानुसार शरीर शुद्ध असेल तर प्राणायाम आणि ध्यान धारणा अधिक प्रभावी करता येते.

Kapalbhati Pranayam ही योगाभ्यासाची भक्कम पायाभरणी आहे मात्र योग्य पद्धतीने आणि आवश्यक काळजी घेऊनच त्याचा सराव करावा. कपालभातीद्वारे नियमित आणि संयमित सराव केल्यास मन प्रसन्न, शरीर हलके आणि ऊर्जायुक्त बनते.

WhatsApp Group join link Join Now

Leave a Comment